पक्षाला विश्वासात न घेताच नियोजन : पंढरपूर तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांनी व्यक्त केली नाराजी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे. परंतु स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांना याबाबत कसलेही विचारात तर घेतले नाही. उलट भाजपाचे नेते कल्याणराव काळे यांचं नाव प्रमुख उपस्थिती मध्ये घेतले होते. यावरून आता राष्ट्रवादीतच या जनसंवाद यात्रेमध्ये विसंवाद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांनी दिली आहे.
जनसंवाद यात्रेसंदर्भात पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही प्रमुख पदाधिका-यांशी भगिरथ भालके यांनी चर्चा केलेली नाही तेंव्हा प्रथम त्यांनी स्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधावा असा सल्ला ही दीपक पवार यांनी दिला. आदरणीय स्व.भारतनानांच्या जयंतीनिमित्त या जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे व स्व.भारतनाना यांनी कधीही सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तुटू दिली नाही म्हणुनच ते लोकनेते होते. किमान त्यांच्या जंयतीदिनी तरी कार्यकर्त्यांचा अनादर होऊ नये, अशी अपेक्षा दीपक पवार यांनी व्यक्त केली आहे.
कल्याणराव काळेंनी आता दुटप्पी वागणे बंद करावे व ते नक्की कोणत्या पक्षात आहेत ते स्पष्ठ करावे. राष्ट्रवादीत ते येणार असतील तर त्याला आमचा विरोध नाही, परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करायचा, नोव्हेंबर मध्ये आदरणीय पवार साहेब, अजितदादा, जयंत पाटीलसाहेब, बाळासाहेब पाटीलसाहेब यांच्या मागे लागुन कर्ज मिळवायचे, डिसेंबर मध्ये पुन्हा पदविधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे काम करायचे परत साहेबांच्या दौऱ्यावेळी येऊन लुडबुड करायची असले धंदे काळे यांनी बंद करावेत.
पंढरपुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना विचारात न घेता कोणी गृहीत धरणार असाल तर ते कदापी सहन केले जाणार नाही. असा इशाराही दीपक पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये ज्या कार्यकर्ते व पदाधिका-यांनी स्वतःच्या स्वार्थाचा व अडचणींचा विचार न करता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन पक्ष सत्तेवर येण्यासाठी अतिशय मजबूत अशी लढाई केली व पक्ष तालुक्यातील घराघरात पोहचविला त्यांना विश्वासात न घेता भाजपच्या नेत्याचे नाव महाविकास आघाडीच्या पत्रिकेमध्ये घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत.