पंढरपूरमध्ये प्रचार सभेत जयंत पाटील यांची महायुतीच्या कारभारावर टीका

पंढरपूर : प्रतिनिधी
उत्तरप्रदेशातून येऊन योगी आदित्यनाथ बटेंगे तो कंटेंगे ची घोषणा देतात, त्यांचा अर्धा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात रोजगारासाठी येतो आहे,भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशात ११ व्या क्रमांकावर घसरले आणि गुजरातचे वाढले. महाराष्ट्रातील उद्योग नेऊन गुजरात श्रीमंत केला जातोय, उद्या नाशिक जिल्ह्यातील नद्यांचे पाणीसुद्धा गुजरातला नेले जाईल, देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात बटेंगे तो कंटेंगे नाही तर पढेंगे तो बढेंगे या धोरणाची गरज असलयाचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादीचे पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले कि, आमचे सरकार अडीच वर्षाच्या काळात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा पाणी कोटा १ टीएमसी वरून दोन टीएमसी केला असून म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्नहि आम्ही सोडविणार आहोत, मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही मैत्रीपूर्ण लढत होईल. अनिल सावंत यांनाच शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, हे विसरू नका, पवारांच्या निर्णयाची वाट न बघणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा असे वक्तव्य करून काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्यावरही त्यांनी सणसणीत टीका केली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, प्रा. लक्ष्मण ढोबळे, वसंतराव देशमुख , डॉ श्रीमंत कोकाटे, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुजे आदी मान्यवर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेदवार अनिल सावंत यांनी, पक्षाने उमेदवार देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास मी सार्थक करून दाखवणार आहे, एक परिचारिकांच्या जीवावर आमदार झालेला व्यक्ती आहे. दुसरे आपल्या सहकारी पक्षातले उमेदवार हे नेहमी नॉटरीचेबाल असतात. या मतदारसंघात विद्यमान आमदार सांगतात 3000 कोटीची कामे केली, मात्र हे केवळ मोठमोठे आकडे सांगतात त्यांची कामे फक्त कागदावर आहेत, अशी टीका केली.