7 दिवस गावात बंद पाळण्यात येणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
करकंब मध्ये सोमवार सकाळी आणखी 2 नविन कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. 1 रुग्ण बरा झाला आहे तर दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे करकंबमधील एकूण पाच कोरोना बधितांची संख्या झाली आहे. नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण पंढरपूर येथे नोकरीस आहेत. ह्यातील एकजण रक्त-लघवी तपासणी लॅबमध्ये तर एकजण तहसील कार्यालयामध्ये संगणक ऑपरेटर म्हणून नोकरीस आहे. त्यातील एकास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तर एकजण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांचे दोन जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले होते. त्यांनतर त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले होते. स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा इतरांशी संपर्क आला नसल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यापूर्वी मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एका रुग्णाने आपल्या मित्रांच्या वाढदिवसासही हजेरी लावली असल्याची चर्चा आहे. पोलिस आणि आरोग्य विभागामार्फत त्यांच्या थेट संपर्कातील आणि अप्रत्यक्ष संपर्कातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. करकंबमधील दोन कोरोनाबाधित रुग्णावर सध्या उपचार चालू असून त्याच्या संपर्कातील काही जणाचे अहवाल येणे बाकी असतानाच आता आणखी दोन रुग्ण आढळल्याने करकंब आणि परिसरातील गावांची चिंता वाढली आहे.
स्वॅब घेतल्यानंतर रुग्ण सोडले घरी
पोलिस, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत स्तरीय समित्यांनी कोरोनाचा मुकाबला करताना सुरुवातीला अत्यंत नियोजन बद्ध काम केले होते. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवून वेळीच संस्थात्मक विलगीकरण केले जात होते. त्यामुळे करकंब व बार्डीतील दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळून देखील ती साखळी तोडण्यात यश आले होते. पण सध्याचे रुग्णांचे मात्र स्वॅब घेतल्यानंतरही संस्थात्मक विलगीकरण न करता त्यांना होम कॉरंटाईन केले होते. ही बाब गंभीर असल्याचे बोलले जात आहे. स्वॅब घेतलेल्या संशयितांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत तरी त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे गरजेचे होते अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.
सात दिवस करकंब बंद
करकंब मधील दवाखाने व मेडिकल सेवा चालू राहतील, परंतु पुढील सात दिवस करकंब गाव पुर्णपणे बंद राहिल, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– आदिनाथ देशमुख
सरपंच करकंब