कोरोनाबाधित कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यु : करकंब पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

पोलिसानी जपले माणुसकीचे नाते : आणि केले अंत्यसंस्कार

पंढरपूर : ईगल आय मीडिया


सांगवी (ता.पंढरपूूूर ) येथील एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती कोरोनाबाधित आहेत आणि ते पंढरपूर येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांच्या घरी विलगिकरणात असलेल्या ६० वर्षे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि त्यांच्या घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव असल्याने त्यांचे अंत्यविधी करिता गावातील कोणी पुढे येत नव्हते. शेवटी करकंब पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश मुंडे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन हा अंत्यविधी पार पाडला.

करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या २६ गावात भेटी देऊन त्या त्या गावातील प्रमुख व्यक्तीशी संपर्क ठेऊन कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

सांगवी गावात आतापर्यंत १७ व्यक्ती ला कोरोना ची लागण झाली होती, सध्या पाच व्यक्ती पंढरपूर येथे उपचार घेत आहेत, काल एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीचा शेतातील घरीच विलगिकरणात असताना मृत्यू झाला. सदर मयताच्या कुटुंबातील इतरांना कोरोना झाला असल्याने अंत्यविधीला गावकरी जाण्यास धाडस करीत नव्हते. त्यांचा मुलगाही उपस्थित राहू शकत नव्हता. त्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक सुन व जावई यांचे उपस्थितीत पोलिसांनी कोविड चे नियम पाळून अंत्यविधी करण्यास मदत करून मृतास अग्नी दिला.

एका बाजूला पोलिसांना कोविड युद्धाच्या ड्युटीवर राहून प्राण पणाने लढावे लागत आहे, गेल्या वर्षभरात शेकडो पोलीस जीवाला मुकले आहेत. तरीही दुसऱ्या लाटेत पेटलेल्या कोविड युद्धात लढताना माणुसकी जपत असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!