कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना ओमीक्रोनची बाधा
टीम : ईगल आय मीडिया
कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसणाऱ्या डॉक्टर ला ओमीक्रोन ची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील अन्य 5 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमध्ये 2 ओमीक्रोन बाधित रुग्ण आढळले,त्यातील एक जण आफ्रिकेतील असून आढळलेल्या दुसऱ्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबाबत अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
ही व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. २२ ते २४ नोव्हेंबर पर्यंत ते गृह विलगीकरणात होते. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारांनंतर ते बरे झाले असून २७ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे बेंगळुरू महापालिकेकडून सांगण्यात आले.
या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील १३ आणि दूरच्या संपर्कातील २०५ जणांची २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान चाचणी करण्यात आली असून त्यातील जवळच्या संपर्कातील तीन व दूरच्या संपर्कातील दोन अशा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना शासकीय रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बाधित रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले असून कर्नाटकची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.