कार्तिकी यात्रेचा जनावरांचा बाजार रद्द

सलग दुसऱ्या वर्षी जनावरांचा बाजार खंडित : घोडयांसह व्यापारीही परतले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या येथील जनावरांच्या बाजारास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जनावरांच्या बाजाराची परंपरा खंडित होत आहे. दरम्यान, जनावरांचा बाजार भरणार नाही हे बाजार समितीकडून सांगीतले जाताच यंदा तरी घोडे बाजार भरेल या अपेक्षेने आलेले घोडे व्यापारी निराश होऊन परतले आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रेची तयारी सुरू आहे. मागील वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती,मात्र यंदा यात्रा भरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे आणि नगरपालिका, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यात्रेची तयारी चालवली आहे. मात्र कार्तिकी निमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारास परवानगी नाकारली आहे. 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत बाजाराचे नियोजन करू नका असे,पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीस या संदर्भात कळवण्यात आले आहे. 


जिल्हाधिकारी यांची परवानगी नसल्याने यंदा ही कार्तिकी चा जनावरांचा बाजार भरणार नाही.कोरोनामुळे यंदा ही जनावरांच्या बाजारास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. त्यानुसार यंदाचा बाजार भरणार नाही. शेतकऱ्यांनी आपली जनावरे घेऊन बाजारासाठी येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. श्री.कुमार घोडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती,पंढरपूर

जनावरांचा बाजार हा किमान 4 ते 6 दिवस चालत असतो. शिवाय बाजारात हजारो जनावरे आणि दररोज हजारोंच्या संख्येने शेतकरी खरेदी विक्रीसाठी येत असतात. हे लक्षात घेता कोरोना विषयक नियमांचे पालन होणे अशक्य आहे. यामुळे कोरोना साथीचा प्रसार होऊ शकतो, तसेच जनावरांना लाळ खुरकत रोगाची साथ आहे. हे लक्षात घेऊन जनावरांचा बाजार भरवणे उचित ठरणार नाही, असा अहवाल प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिला आहे.

घोडे व्यापारी परत गेले
जनावरांच्या बाजारास परवानगी नाकारल्यानंतर 11 वर्षांनी येथील बाजारात घोडे घेऊन आलेले व्यापारी आज ( गुरुवारी ) परत गेले आहेत. येथील सुप्रसिद्ध घोडे बाजार 2009 पासून खंडित झालेला आहे. मात्र यंदा तीन ते चार व्यापारी 30 घोडे घेऊन बाजारासाठी आले होते. मात्र बाजार समितीने त्यांना परवानगी नसल्याचे सांगितल्यानंतर ते घोडे घेऊन परत गेले आहेत. 

 त्यामुळे यंदा जनावरांच्या बाजारास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. बाजार समितीच्यावतीने वाखरी पालखी तळावर बाजार भरणार नाही, अशा प्रकारची नोटीस आणि फलक लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी बाजारात आपली जनावरे अनु नयेत असे आवाहन ही बाजार समितीने केलेले आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!