पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यासह ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनीक कार्यक्रम व लग्नसमारंभास शासनाने घातलेले निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळें सार्वजनीक कार्यक्रम व लग्नसमारंभास नागरिकांनी व आप्तेष्टांनी गर्दी केल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे, आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
नागरिक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी सामुहिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लग्न समारंभाच्या निमित्ताने वेगवेळ्या भागातून आप्तस्वकीय येत असतात. त्यातील काही नातेवाईक व नागरिक रेड झोन मधील ठिकाणाहून येत असून, त्यांचा कार्यक्रमात सहभाग असतो. अशा कार्यक्रमात सामुहिक संपर्क निर्माण झाल्याने बाधित व्यक्तीकडून लहान मुलांसह वयोवृध्द नारिकांशी संपर्क येतो.ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या रेड झोन आलेल्या नागरिकांमुळे वाढली असल्याचे ढोले यांनी सांगितले.
तालुक्यात नियोजित लग्नसमारंभ अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रम, बैठका आप्तस्वकीय व निमंत्रितांच्या उपस्थित पार पाडावेत. उपस्थित नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आयोजकांची असेल. कार्यक्रमास व इतर सार्वजनीक बैठकीस गर्दी होणार नाही अशा स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन करावे. यापार्श्वभूमीवर सर्व मंगलकार्यालये, विविध सामाजिक संस्था, नागरिकांनी विविध संस्था संघटना यांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम साजरे करताना साधेपणाने साजरे करावेत. जेणेकरुन कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे शक्य होईल.असे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या आयोजक व्यक्ती, संस्था यांच्यावर साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच लगन् समारंभ व इतर कार्यक्रम मर्यादित नागरिकांच्या उपस्थित साजरे करावेत. कार्यक्रमात रेडझोन मधून आलेल्या नागरिकांचा संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.