खा. शरद पवारांनी राजूबापूंच्या कुटुंबाला दिली ग्वाही
पंढरपूर : ईगल आय मीडिया
यशवंतभाऊ, राजूबापू यांच्या सारखे पक्ष आणि मी स्वतः आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आली, काही मदत लागली तर कधीही फोन करा, येऊन भेटा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पाटील कुटुंबाला दिली.
राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांचे निधन झाल्यानंतर खा. शरद पवार यांनी मंगळवारी भोसे ( ता. पंढरपूर ) येथे येऊन राजूबापू पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. सकाळी साडे अकरा च्या सुमारास खा पवारांचे भोसे येथे आगमन झाले. यावेळी सोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ भारत भालके, आम. यशवन्त माने, आ बबनराव शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.
यावेळी खा पवारांनी राजूबापू पाटील, महेश पाटील, अनंतराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राजू बापू पाटील यांचे बंधू शेखर पाटील, सुपुत्र गणेश पाटील यांच्याकडे विचारपूस केली. घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. साखर कारखान्याची माहिती घेतली. काही अडचण आल्यास कधी या भेटा, फोन करा आम्ही पाठीशी आहोत. यशवन्त भाऊ, राजूबापू यांचे कार्य पुढे न्या तसेही पवार यावेळी म्हणाले. यानंतर सव्वाबारा च्या सुमारास पवार पंढरपूर कडे रवाना झाले.