उष्मा घात कि चेंगरा चेंगरी ? विरोधकांचा सवाल

खारघर येथील दुर्गघटनेचा व्हिडीओ व्हायरल

टीम : ईगल आय न्यूज
रविवारी खारघर येथे झालेल्या वादग्रस्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळय़ात दुर्घटनेच्या काही चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. या दृष्यांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे दिसत असून त्याआधारे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. या चित्रफिती नेमक्या कुठल्या आहेत आणि चित्रिकरण कुणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खारघर येथे रविवारी भर दुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाला आलेल्या १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. चार दिवस उलटल्यानंतर, बुधवारी या घटनेच्या कथित चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसृत झाल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या चित्रफिती आपल्या समाजमाध्यम खात्यांवर टाकत सरकारला सवाल केले आहेत.

vdo मध्ये काय?
समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या चित्रफितींमध्ये जमिनीवर निपचित पडलेले काही लोक आणि त्यांना उठविण्याचा प्रयत्न करणारे नातलग दिसत आहेत. गर्दीमुळे या लोकांजवळ रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नव्हती. चित्रफितीमध्ये रुग्णवाहिकेच्या ‘सायरन’चा आवाज सातत्याने ऐकू येत आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर एकाच वेळी घरी जाण्यासाठी श्रीसदस्यांची गर्दी उसळली आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बाहेर पडेपर्यंत पोलिसांनी रस्ते अडवून ठेवले होते. त्यामुळे गर्दीत धक्काबुक्की झाल्याचा आरोप या चित्रफितींच्या आधारे करण्यात आला आहे. जागरण, सकाळपासून घडलेला उपास आणि उष्माघात यामध्ये चेंगराचेंगरीची भर पडल्यामुळे हलगर्जीपणा, नियोजनातील ढिसाळपणाही दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

कार्यक्रमस्थळाच्या पूर्व बाजूस काही इमारती असून तेथील रहिवाशांनी हा कार्यक्रम घरातून पाहिला. यातील काहीजणांनी गोंधळाची दृष्ये मोबाईल कॅमेऱ्यात टिपल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही दृष्ये याच कार्यक्रमाची आहेत की अन्य एखाद्या कार्यक्रमातील याची खातरजमा होऊ शकलेली नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबद्दल स्पष्ट बोलण्यास नकार दिला असला तरी शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!