खेड भोसे गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

300 बधितांपैकी केवळ 2 जण ऍक्टिव्ह रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील खेड भोसे गावची सध्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या वीस दिवसांपूर्वी तालुक्यात हे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते.मात्र युवा सरपंच सज्जन लोंढे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाच्या साथीने केलेल्या अचूक नियोजनामुळे एकेकाळी हॉटस्पॉट असलेल्या खेड भोसे गावात गेल्या आठ दिवसात केवळ ४ जण बाधित सापडले आहेत. तर एकूण 2 जण उपचार घेत आहेत. त्यामुळे 3 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ह्या गावची सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.


गेल्या महिन्यात गावात अतिशय वाईट परिस्थिती होती.आणि गावात कोरोनाच्या साथीने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात तब्बल 8जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. या परिस्थितीत गावाला आधार देण्याची व अचुक नियोजनाची आवश्यकता होती.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टिंगवर सर्वाधिक भर दिला.

यावेळी रोपळ्याच्या आरोग्य विभागाचे डॉ. सरवदे, डॉ.राऊत ,डाँ गोरे यांनी चांगली साथ दिल्याने गावातच एक दोन दिवसाच्या फरकाने तब्बल १२ तपासणी कॅम्प घेण्यात आले. यामुळे बाधित लोकांना ओळखून त्यांना विलगिकरणात पाठविणे सोपे झाले. सोबतच गेल्या महिन्याभरापासून सकाळी ८ ते रात्री १२ पर्यंत गावात पोलिसांच्या सहकार्याने लोकांना विनाकारण फिरण्यास प्रतिबंध केला. मास्क वापरणे सक्तीचे केले, सोबतच गावाचे ४ वेळा निर्जंतुकीकरण केले. प्रत्येक घर आणि घर ह्यात फवारून काढण्यात आले.

गावातील कुणीही व्यक्ती आजारी असला तर त्यांची डॉक्टरांकडून माहिती घेऊन कोरोना टेस्ट करायला भाग पाडले. सोबतच ज्यांना बेड मिळत नाही अशा लोकांना डॉक्टरांशी बोलून बेडची सोय मिळवून दिली. ग्रामपंचायत सरपंच सज्जन लोंढे, उप संरपच सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व तलाटी, ग्रामसेवक, मनसेचे हेमंत पवार, सिदेश्वर पवार, चेअरमन दूध संस्था बंडू पवार, कल्याण पवार, सोसायटी चेअरमन यांचे यावेळी मोलाचे योगदान मिळाले.

सोबतच आरोग्य विभाग पंढरपूर व रोपळे तसेच पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, गट विकास आधीकारी रविकिरण घोडके यांचे मोलाचे योगदान लाभले. सध्याही आम्ही रोजच्या रोज प्रत्येक घरी भेट देऊन कुणी आजारी आहे का याची माहिती घेतो.आजवर राबवलेल्या योग्य नियोजनाच्या आधारे येत्या दहा दिवसांत आमचे गाव कोरोनामुक्त करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.असे सरपंच सज्जन लोंढे म्हणाले.

गेल्या महिन्यात कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या खेड भोसे गावात आजवर 20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून २२० जण एकूण बाधित आढळले आहेत.तर 2 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.मात्र युवा सरपंच संज्जन लोंढे यांनी गावासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे संपूर्ण गाव त्यांचे आभार मानत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!