‘आय आय टी’ ची डाॕक्टरेट धारक झाला खेडभाळवणीचा सरपंच

उपसरपंचपदीही पदवीधर युवतीला संधी


पंढरपूर : ईगल आय मीडिया

आय आय टी मुंबईमध्ये एरोस्पेस या विषयात डाॕक्टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणार्या प्रा.डाॕ.संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता.पंढरपूर ) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणार्या अश्विनी अविनाश पाटिल यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवडूण दिले आहे.


या गावात ग्रामपंचायत स्थापनेपासून 65 वर्षात प्रथमच सत्तांतर घडले आहे. खेडभाळवणीकरांनी उच्च शिक्षित तरुणांना संधी दिली. राजकारणाकडे उच्चशिक्षित तरुणांची पाहण्याची दृष्टी नकारात्मक असतानाच डाॕ.संतोष साळुंखे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविला.


स्वेरी इंजिनिअरिंग काॕलेजला विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाच्या नोकरी बरोबर डाॕ.संतोष साळुंखे हे आधुनिक शेतीही करतात. ग्रामविकासाबरोबरच तरुणांना ग्रामोद्योगाद्वारे गावातच विविध लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच डाॕ.संतोष साळुंखे यांनी सांगितले. त्यासाठी गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगून आदर्श ग्राम निर्मिती करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

उपसरपंचपदी पदवीधर असणार्या अश्विनी साळुंखे यांनीही ग्रामविकासाबरोबरच महिलांसाठी काम करणार असल्याचे सांगितले .


या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आमदार प्रशांत परिचारक, भगिरथ भालके, स्वेरी इंजिनियरींग काॕलेजचे प्राचार्य डाॕ.बी.पी.रोंगे सरांनी सत्कार केला. नानासाहेब घालमे गुरुजी, भारत साळुंखे, सुभाष पाटिल, लक्ष्मण साळुंखे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.आर.देशमुख, एन जे खांडेकर, बिंटू कौलगे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

error: Content is protected !!