खेडभोसे ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव
पंढरपूर : eagle eye news
खेडभोसे ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावात सुरु असलेले अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करणारा ठराव केला आहे. दरम्यान यापूर्वी करकंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करूनही अवैध व्यवसाय बंद झाले नाहीत. त्यामुळे करकंब पोलीस ठाण्याच्या विरोधात अनेक गावांतील वैतागलेल्या ग्रामस्थांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे.
खेडभोसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा२९ ऑगस्ट रोजी सरपंच सुरेखा देवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच अश्विनी पवार, तलाठी प्रकाश भिंगारे यांच्यासह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
जेमतेम १८०० मतदार असलेल्या या गावात ४ ठिकाणी अवैध दारू विकली जाते. यामुळे गावातील अनेक संसार धुळीस मिळाले आहेत. महिलांना मारहाण करणे, गावातील सार्वजनिक शांतता भंग करण्याचे प्रकार तळीरामांकडून होत आहेत. त्यामुळे महिलांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. २९९ रोजी आयोजित ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी मांडला. त्यास ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार यांनी अनुमोदन दिले.
ग्रामस्थांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबाबत ग्रामपंचायतीने करकंब पोलिसांना गावात संपूर्ण दारूबंदी केली असल्याबाबत पत्र पाठवले आहे. आता करकंब पोलीस काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करूनही अवैध व्यवसाय बंद नाहीत
खेडभोसे गावात खुलेआम अवैध दारू विक्री केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा दारूबंदीचा ठराव केला होता, तसे पत्रही करकंब पोलिसांना देऊन या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून एकदाही या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली नाही. याउलट दारू बंदी विषयी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना दारू विक्रेते फोन करून धमकावत आहेत, अशाही तक्रारी आलेल्या आहेत.