दूध दरवाढ आंदोलन : पंढरीत खोतांचा फ्लॉप शो

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांह शेतकऱ्यांनीही फिरवली पाठ

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गाईच्या दुधाला ३० रुपये दर मिळावा, १० रुपये अनुदान आणि दूध पावडर निर्यातीला प्रति किलो ५० अनुदान द्यावे आदी मागण्यासाठी माजी कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत आणि माजी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक करुन साकडे घातले. महायुतीच्या या राज्यव्यापी आंदोलनात दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग न घेतल्याने हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत माजी मंत्र्यांच्या आंदोलन नाट्याचा पडदा पडला.
दूध दरवाढ आंदोलन हे भाजप आणि मित्रपक्ष महायुतीच्या अजेंड्यावरील विषय होता. मात्र या आंदोलनात कुठेही ताळमेळ दिसून आला नाही. महायुतीतील दोन माजी मंत्र्यांनी एकत्र येऊन या आंदोलनाचा श्री गणेशा करायला हवा होता, मात्र हे दोन्हीही नेते वेगवेगळ्या वेळी येऊन आपापला अंक सादर करून गेले.

एवढंच नाही तर विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आ. प्रशांत परिचारक हे विठ्ठल मंदिरा पासून हाकेच्या अंतरावर असूनही दोन्हीपैकी एकही नेत्यांसोबत उपस्थित नव्हते. त्यांचे पुतणे प्रणव परिचारक यांनी सदाशिव खोत यांच्यासोबत हजेरी लावली. बाकी स्थानिक भाजपचे पदाधिकारी इकडे फिरकले सुद्धा नाहीत.


माजीमंत्री महादेव जानकर यांनी सकाळी साडेसहा वाजता चंद्रभागेच्या वाळवंटात तर माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी साडेसात वाजता श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर प्रतिकात्मक श्री विठ्ठल मूर्तीवर दुग्धा अभिषेक केला.

या आंदोलनाचा फार मोठा गाजावाजा करुन देखील दूध उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले दिसले नाही.
दोन्ही आंदोलनात माजीमंत्र्यांचे सातआठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आंदोलन निरस झाले होते.
भाजपशी जवळीक करण्यापूर्वी या नेत्यांची जी समाजात प्रतिमा होती ती आता राहिली नाही हे या प्रसंगावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्री खोत यांनी ठाकरे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे असल्याची टीका केली तर श्री जानकर यांनी महायुतीच्या सत्तेत १२०० कोटींचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटले होते या सरकारने एक रुपयाची मदत केली नसल्याचा टीका केला.

2 thoughts on “दूध दरवाढ आंदोलन : पंढरीत खोतांचा फ्लॉप शो

  1. शेतकऱ्यांनी पक्ष संघटना कोणती आहे हे न पाहता शेतकरी हिताच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. कदाचित कोरोना मूळे शेतकरी आले नसावेत. जाती साठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणारे शेतकरी ज्या दिवशी शेतकरी या एकाच जातीसाठी एकत्र येतील त्या दिवशी सरकार शेतकऱ्याला प्राधान्य देईल.

Leave a Reply

error: Content is protected !!