कोरोना मुळे प्रथमच नवरात्रात मंदिर बंद
टीम : ईगल आय मीडिया
कोरोनमुळे मंदिर खुले करण्यास राज्य शासनाची परवानगी नसल्याने कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. असे बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर हा उत्सव मंदिर अंतर्गत साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात नियोजनाची बैठकीत मंदिरातील सर्व धार्मिक विधी शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात अद्यापही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नवरात्र उत्सवामध्ये मंदिर सुरू करण्यात यावे. अशी मागणी होत असली तरी अद्याप याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही. यंदा कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार नाही. ‘मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र परंपरेनुसार मंदिरा अंतर्गत धार्मिक विधी केले जाणार आहेत,’ असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सांगितले.
दरम्यान, नवरात्र उत्सव जवळ येऊ लागल्या असल्याने आज देवस्थान समिती कार्यालयात पोलीस प्रशासन, वीज मंडळ, महानगरपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार, पुजारी, सेवेकरी, सुरक्षा यंत्रणा यांच्या समवेत वेगवेगळ्या बैठक घेण्यात आली. उत्सव काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियम व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार आहेत, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.