अक्कलकोट, बार्शी, द सोलापूर हॉटस्पॉट होताहेत
सोलापूर : ईगल आय मीडिया
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर शहरात तळ ठोकून शहरवासीयांना तसेच प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या कोरोना विषाणूने आता आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हे तिन्ही तालुके हॉटस्पॉट होऊ लागले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील चिंता अधिक वाढली आहे.
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 13 एप्रिल रोजी सोलापूर शहरात सापडला होता. त्यानंतर गेले दोन महिने शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सोलापूर शहरात आजवर 2 हजरापेक्षा जास्त रुग्ण सापडले असून 110 च्या वर मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर हे राज्यात हॉटस्पॉट लिस्ट मध्ये होते. तुलनेने ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता.
अगोदर सांगोला,मग माळशिरस त्यानंतर मोहोळ,बार्शी अशा क्रमाने ग्रामीण भागात काही रुग्ण सापडले मात्र माळशिरस, सांगोला तालुक्यांनी त्यावर नियंत्रण मिळवले आहे. पंढरपूर तालुक्यातही बाहेरून आलेल्या 8 जणांना कोरोना पॉजीटीव्ह होता मात्र तेसुद्धा रुग्ण आता बरे झाले आहेत.
त्यामुळे पंढरपूर आता कोरोनामुक्त झाले आहे.
दरम्यानच्या काळात अक्कलकोट, बार्शी, सोलापूर शहरालगत असलेले दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ हे तालुके कोरोनाच्या विळख्यात अडकले जाऊ लागले आहेत.
21 जून रोजी अक्कलकोट तालुक्यात 30, बार्शी तालुका 30, दक्षिण सोलापूर 90, उत्तर सोलापूर 13, मोहोळ तालुक्यात 10, माढा तालुका 7 असे रुग्ण आढळले असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून 196 तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 109 झाली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजवर कोरोनामुळे 11 लोकांचे जीव गेलेले आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा झालेला शिरकाव प्रशासनापुढचे नवीन संकट ठरले आहे. रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत असून आता स्थानिक लोकांच्या माध्यमातून संसर्ग होऊ लागल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभा राहीले आहे.