शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
मोहोळ : ईगल आय मीडिया
महामार्ग क्रमांक ९६५ साठी जमीन संपादित होऊन देखील मोहोळ भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे अन्याय झाल्याचा आरोप करत सारोळे तालुका मोहोळ येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विशाल कैलास शिंगाडे (वय २६ वर्षे रा. सारोळे ता. मोहोळ) असे विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहोळ पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विशाल शिंगाडे या शेतकऱ्याची पेनूर गावच्या शिवारात गट नं. ९६४ ही शेतजमीन आहे. प्रत्यक्षात सदरची शेतजमीन महामार्ग क्रमांक ९६५ साठी संपादित झालेली आहे. मात्र मोहोळ भुमिअभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक सुजाता माळी यांनी सदर जमीन महामार्गात संपादित होत नसल्याचा खोटा अहवाल प्रांताधिकारी पंढरपूर यांना दिल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला.
पेनुर हद्दीतील महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीचा योग्य रीतसर अहवाल आम्ही प्रांताधिकार्यांना दिलेला आहे. विशाल शिंगाडे या शेतकऱ्याने केलेला आरोप चुकीचा आहे.
– सुजाता माळी
उपअधीक्षक भूमी अभिलेख मोहोळ.
या अहवालामुळे नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम राजाभाऊ धोंडिबा उन्हाळे या शेतकऱ्यास मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत सदर शेतकऱ्याने भुमिअभिलेख प्रशासन, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील मला न्याय मिळाला नाही. तर दुसरीकडे आमचा वाद मिटेपर्यंत माझ्या क्षेत्रातून सुरू असलेले महामार्गाचे काम थांबवा अशी विनंती ठेकेदाराला केली असता, सनी पवार या इसमाने ३५३ ची केस करण्याची धमकी दिली. त्यामुळे विशाल शिंगाडे हा शेतकरी खचला होता.
माझी बाजू न्यायाची आहे, भुमिअभिलेख प्रशासन, महामार्गाचे ठेकेदार, आणि राजाभाऊ उन्हाळे या सर्वांनी संगनमताने माझ्यावर अन्याय केला आहे. मला न्याय न मिळाल्यास यापुढेही मी टोकाचे पाऊल उचलणार आहे.
विशाल शिंगाडे, पिडीत शेतकरी
दरम्यान १७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता त्याने आपल्या राहत्या घरी कोराजन नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ विशाल शिंगाडे यास उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे होणारा अनुचित प्रकार टळला. सध्या त्याच्यावर मोहोळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाची मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू केलेला आहे. महामार्गाचे ठेकेदार आणि भूमी अभिलेख प्रशासनाची बाजू ऐकून घेऊन चौकशीअंती दोषी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर भुमिअभिलेख प्रशासन आणि महामार्ग प्रशासनाने आपले हात वर केल्यामुळे पेनुर, सारोळे सह तालुक्यातील शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.