अजूनही 50 जण बेपत्ता : ठाकरे आज गावास भेटणार
टीम : ईगल आय मिडिया
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे. यामध्ये आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झालाय तर अजून 35 ते 40 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
दरड कोसळल्यामुळे 32 ते 35 घर जमीन दोस्त होऊन उताराच्या दिशेने सर्व वाहून गेले, यात मृतदेहही खाली वाहून गेले आहेत. एनडीआरएफचे जवान शोध घेत आहेत.
महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घडलेल्या दुःखद घटनेने संपूर्ण देश भरातून हळहळ व्यक्त केली जातीय.
या दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.
तळीये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघत आहेत. गावात मदत आणि बचावकार्य जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत.