महिला वन परीक्षेत्र अधिकाऱ्याची गोळ्या झाडून घेत आत्महत्या

टीम : ईगल आय मीडिया

गुगामल ( जिल्हा अमरावती ) वन्यजीव विभागातील वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण ( वय 35 वर्षे ) या महिला अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ( दि.25 ) रोजी सायंकाळी साडे 5 वाजण्याचे सुमारास घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

दिपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागात वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून मागील पाच वर्षापासून कार्यरत होत्या तर त्या हरिसाल येथे राहत होत्या. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास त्यांच्या निवासस्थानावरून गोळी झाडल्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक, वन कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावत पोहोचले. यावेळी दिपाली चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

या घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. गोळी झाडण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी नऊ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती असे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिपाली चव्हाण यांनी लिहीलेली चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीवरून त्यांच्या आत्महत्येचे कारण उघडकीस येणार आहे.

दरम्यान, धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षकाने ७ फेब्रुवारी रोजी त्याच्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असताना आज आरएफओ महिला अधिकाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!