मुंबईतील जिम मालकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली
टीम : ईगल आय मीडिया
लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील जिम बंद असून, त्या सुरू करण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अशी मागणी राज्यातील जिम मालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील जिम मालकांनी भेट घेतली.
यावेळी जिम सुरू करण्याबद्दल राज्य सरकार सकारात्मक असून, जिममुळे करोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी मार्गदर्शक तत्वे सादर करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांना केली आहे.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील जिम बंद करण्यात आल्या होत्या. मार्चपासून जिम बंद असून, मागील काही दिवसांपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे.
जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत, त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल,” असं मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांच्या शिष्ट मंडळाला सांगितलं.