मोहोळ तालुक्यात विजांचे थैमान

तांबोळे येथे 1 ठार; पोखरापूरात एक जण गंभीर : तर कोन्हेरीत म्हैस दगावली.

टीम : ईगल आय मीडिया


परतीच्या पावसामुळे मोहोळ तालुक्यात शनिवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून जीवित हानी झाली. यामध्ये नजीक पिंपरी येथील एक शेतकरी ठार तर दुसरा शेतकरी गंभीर जखमी झाला. पोखरापूर येथे घराच्या दरवाज्यात वीज पडल्याने धक्का बसून एका इसमाच्या डोक्यात लोखंडी खिळा घुसला आहे. तर कोन्हेरी येथे वीज अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याची म्हैस जागीच ठार झाली.


परतीच्या पावसाने मोहोळ तालुक्यात धुमाकूळ घातला असून वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने विजा पडण्याच्या घटना मध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवार ९ ऑक्टोबर रोजी नजीक पिंपरी येथील शेतकरी बाळू गोविंद सरवदे (वय ५२ वर्षे) व त्यांचा मोठा भाऊ प्रकाश गोविंद सरवदे (वय ५५ वर्षे) हे दोघे तांबोळे गावच्या हद्दीत शेतीची कामे करीत होते. दुपारी पावणेतीन वाजता पावसाला सुरुवात होऊन बाळू सरवदे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर प्रकाश सरवदे हे किरकोळ जखमी झाले.


पोखरापूर येथील मारुती कडापा लेंगरे हे घराच्या दरवाज्यात थांबले होते. यावेळी त्यांच्यासमोर वीज पडल्याने धक्का बसून ते बाजूला पडले. यावेळी एक मोठा लोखंडी खिळा त्यांच्या डोक्यात खोलवर घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून देण्यात आले.


कोन्हेरी येथे देखील वीज पडल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता जनार्दन माहिपती मुळे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली आहे. दरम्यान तिने घटनांची नोंद महसूल प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!