राज्यात 1 जून नंतर ही निर्बंध कायम ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. १ जूननंतरही हे निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी माहिती मिळाली आहे ते पाहता लॉकडाऊन १ जूननंतरही कायम राहणार हे निश्चित झाले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जाणार हेसुद्धा स्पष्ट असून नेमकी कोणती मुभा मिळणार आणि कधीपासून मिळणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत ३० किंवा ३१ मेच्या आसपास नवा आदेश जारी होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध १ जूननंतरही लागू राहणार का, नवा आदेश किती दिवसांसाठी असेल?, जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रेड झोन वगळता उर्वरित भागात हे निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार का, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. त्यामुळे निर्बंध शिथील झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

या जिल्ह्यांत नेमके कोणते निर्बंध उठवले जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज्यात सध्या १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू असून त्याआधी नवा आदेश जारी केला जाईल. येत्या काही दिवसांत नव्या आदेशासोबत गाइडलाइन्स जारी होतील, असेही टोपे यांनी नमूद केले.

राज्यातील ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यांत १ जूननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येतील, असे यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेड झोनमधील जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!