कोकणात कालभैरव ट्रॅव्हल्सच्या चालकाचा पराक्रम
टीम : ईगल आय मीडिया
सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला जाणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाने चक्क प्रवाशांसह बस जंगलभागात सोडून धूम ठोकली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळ वालोपे गावाच्या शिवारात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील बांद्याहून मुंबईला (Mumbai) येणाऱ्या बसच्या चालकाने हा पराक्रम केेला आहे.
सारे प्रवासी गाढ झोपेत असताना चिपळूण जवळ वलोपे गावाजवळ असलेल्या जंगलात बस सोडून दिली आणि तो पळून गेला. मध्यरात्री नंतर पहाटे ३ वाजता एका प्रवाशाला जाग आली. त्याने गाडी का थांबलीय हे पाहण्यासाठी सीटवरून उठून पुढे जाऊन पाहिले. तर तिथे ड्रायव्हर दिसला नाही. काही मिनिटे वाट पाहिली परंतू तो न आल्याने त्या प्रवाशाने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली. त्यांना या प्रकाराची माहिती दिली.
बस चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबविलेली असल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला. अखेर पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले. त्यानंतर बसचा मालक, त्यांचा बुकिंग एजंट यांचे फोन लावण्यास सुरुवात झाली. परंतू, त्यांच्यापैकी कोणाचेही फोन लागत नसल्याने प्रवाशांना मदत मिळू शकली नव्हती.
या सगळ्या प्रकाराची चौकशी प्रवाशांच्या सुरक्षेजवळ खेळ करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तर या घटनेमुळे बसच्या प्रवासावर आता भीती व्यक्त करण्यात येत आहे.