1 ठार, 7 जखमी : मदतकार्य जोरात
टीम : ईगल आय मीडिया
महाड शहरातील कोसळलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या 60 लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून अजूनही 30 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने 1 जणाचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. मदत कार्य वेगवान असून एन डी आर एफ च्या 3 टिम्स मदतकार्य करीत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महाडचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी थांबून मदत कार्यास गती दिली आहे.
68 जण बिल्डिंग कोसळतानाच बाहेर पडले, 5 वर्षांपूर्वी बांधलेली तारिक गार्डन ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून हलत होती असे नागरिक सांगतात. त्यामुळे इमारत कोसळण्याची शक्यता लक्षात येताच 68 लोकांनी इमारती बाहेर पडण्यात यश मिळवले. तर 100 च्या आसपास लोक इमारतीत अडकले, त्यापैकी 60 जणांना बाहेर काढले असून आणखी 30 अडकले आहेत.
महाड शहरातील हापूस तलावाजवळ असलेली काजळपुरा परिसरातील 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे. इमारती खाली 100 च्या आसपास लोक अडकल्याची भीती होती. तारिक गार्डन या इमारतीत 40 सदनिका आहेत आणि त्यात 40 कुटूंब राहत आहेत. या इमारतीत 200 नागरिक राहत असल्याचे सांगितले जात आहे. पुण्याहून एन डी आर एफ च्या 3 तुकड्या आल्या आहेत. पोलीस, नगरपालिका कर्मचारी घटनास्थळी गेले आहेत. 17 जखमींना ढिगाऱ्याखालून काढून शहरातील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेचे वृत्त समजताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून मदतीचे आश्वासन दिले.