सुमारे 50 हुन अधिक नागरिक गाडले गेल्याची भीती
टीम : ईगल आय मीडिया
महाड शहरातील हापूस तलावाजवळ असलेली काजळपुरा परिसरातील 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे. इमारती खाली 50 हुन अधिक नागरिक गाडले गेले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी उसळली असून मदत कार्य सुरू झाले आहे.
महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या इमारतीत 200 नागरिक राहत असल्याचे सांगितले जात आहे. ढिगाऱ्याखाली तब्बल 50 हुन अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, पुण्याहून एन डी आर एफ च्या 3 तुकड्या रवाना झाल्या आहेत. पोलीस, नगरपालिका कर्मचारी घटनास्थळी गेले आहेत. 17 जखमींना ढिगाऱ्याखालून काढून शहरातील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5 वर्षांपूर्वी ही इमारत मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी बांधली असल्याचे बोलले जातेय.
बचावकार्य युद्धपातळीवर करा : उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री हे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात असून बचावकार्याची माहिती घेत आहेत.
40 फ्लॅट मध्ये 40 कुटुंबे : 200 लोक निवासी
5 वर्षांपुर्वी उभा राहिलेल्या या इमारतीत एकूण 40 फ्लॅट होते आणि त्यात 40 कुटुंबे राहत होती. सुमारे200 लोक इमारतीत राहतात अशी प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेतील 30 जणांना बाहेर काढले असून शहरातील धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीचे नाव नव्हते असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.