शरद पवारांनी धनगर आरक्षणासाठी दिल्लीत प्रयत्न करावेत

रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांचे जेजुरीत आवाहन

टीम : ईगल आय मीडिया

आमचा पक्ष जरी भाजपसोबत असला तरी, पवार साहेबांचे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे धनगर आरक्षण प्रश्नी दिल्लीत शरद पवारांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन करतानाच मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केले. महादेव जानकर यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हेदेखील उपस्थित होते.

शरद पवार मोठे नेते ! भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खा.शरद पवार यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणास विरोध केल्याकडे लक्ष वेधले असता, आ. जानकर म्हणाले की, खा.शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांचा ही राजकीय पक्ष आहे, आणि हा कार्यक्रम काही राजकीय नाही, त्यामुळे विरोध करणे चूक आहे.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन महादेव जानकर यांनी राजकीय फटकेबाजी केली. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

महादेव जानकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. महादेव जानकर यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!