मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला साजरा

आषाढी यात्रेची पारंपरिक सांगता


पंढरपूर : ईगल आय मीडिया

नामदास व हरिदास यांच्या वंशजाकडून साजरा करण्यात येणारा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत मात्र उत्साहात पार पडला. यानंतर खर्‍या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.


संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाव्दार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुकाचा प्रसाद देत काला करण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार हरिदास घराण्यात अकरा पिढ्यापासून हा उत्सव साजरा केला जातो. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना येथे दिंडीचा मान आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा काल्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात केवळ अकरा जणांना प्रवेश देण्यात आला. परंपरे प्रमाणे दुपारी बारा वाजता काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर दही हंडी फोडण्यात आली.

यानंतर हा उत्सव महाव्दार घाटावरून चंद्रभागेचे वाळवंट, कुंभार घाट, माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथून काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी उपस्थित भाविकांकडून कुंकू, बुक्याची उधळण करण्यात येत होती.

येथे उपस्थितांना लाह्या, दही, दूध आदी पासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील कमी भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला पार पडला. महाव्दार काला साजरा झाल्यानंतर पंढरीतील संचारबंदी उठविण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!