राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

10 वर्षांनंतर पोलीस दलात होणार मेगा भरती

टीम : ईगल आय मीडिया

तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कार्यकाळात टप्प्या टप्प्याने 40 हजाराहून अधिक पोलिसांची भरती झाली होती. त्यानंतर आत सुमारे 10 वर्षांनी राज्यातीलपोलीस दलात एकूण साडेबारा हजार पदे भरण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली.

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस दलात संधी मिळेल, असही देशमुख म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पुढाकाराने तब्बल 40 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे.

या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

One thought on “राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

Leave a Reply

error: Content is protected !!