राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांकडे
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच आज राज्यात करोनाचे तब्बल ९ हजार ८५५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. गेल्या जवळपास साडेचार महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे. दरम्यान, दैनंदिन करोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा वाढत असून ही संख्या सध्या ८२ हजारां पुढे गेली आहे.
राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून दुसऱ्या लाटेची शक्यताही बळावत चालली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रतिबंधात्मक पावले टाकण्यात येत आहे. दुसरीकडे लसीकरणही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. असे असताना रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून पाच ते आठ हजारांच्या प्रमाणात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. या संख्येने आज मोठी उसळी घेतली आहे. हा आकडा थेट दहा हजारांच्या घरात जाऊन पोहचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
आज राज्यात ४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत ५२ हजार २८० रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० % इतका आहे. आज राज्यात ९ हजार ८५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ४३ हजार ३४९ करोना बाधितांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८२ हजार ३४३ इतकी झाली असून त्यात सर्वाधिक १६ हजार ४९१ पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यानंतर नागपूर हा करोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८ हजार ८१० रुग्ण उपचार घेत असून मुंबई पालिका हद्दीत ही संख्या ८ हजार ५९४ इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या ५ हजार ८९६ सक्रिय रुग्ण आहेत.