कमलापूर कोविड केअर सेंटरमध्ये असुविधा : नागरिकांची तक्रार
सांगोला : ईगल आय मीडिया
तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. तेथे योग्य औषधोपचार होत नाहीत,तेव्हा महूद येथील नव्याने सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांना तिकडे घेऊन जाऊ नका,असे म्हणत येथील नागरिकांनी रुग्णांना तिकडे नेण्यास मज्जाव केला.शेवटी पोलिसांना पाचारण केल्यानंतर या रुग्णांना कमलापूर येथे पाठवण्यात आले. महूद येथे आज नव्याने सात रुग्णांची भर पडली असून एकून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 झाली आहे.
महुद येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील तिघांचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये एकाच घरातील तरुण व्यक्ती व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या तिघांना सकाळी कमलापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्याची तयारी सुरू असताना अचानक हे रुग्ण राहात असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने विलगीकरण सोय असलेल्या प्राथमिक शाळेसमोर जमा झाले.आणि त्यांनी कमलापूर येथील सेंटर बाबत अनेक तक्रारी मांडण्यास सुरुवात केली. यावेळी कृती समितीमधील तलाठी, मंडलाधिकारी,सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर जमा झालेले लोक निघून गेले आणि रुग्णांना कमलापूर येथे रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले.
आज नव्याने महूद येथील आतारगल्ली भागात राहणारे एकाच घरातील चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची आज रॅपिड टेस्ट घेण्यात आली होती व त्यानंतर त्यांनाही कमलापूर येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील इतरांना प्राथमिक शाळेत विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. महूद गावठाण पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून एकूण रुग्णांची संख्या दहा झाली आहे.
महूद येथील प्रशासन कोरोना बाबतीत गंभीर नाही.ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.दाट लोकवस्तीत रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी होणे गरजेचे असताना केली जात नाही.महूद गावठाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असले तरी नागरिक सर्वत्र फिरताना दिसत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांच्या मदतीने सेवा पुरवणे आवश्यक आहे मात्र त्याचे नियोजन दिसत नाही.ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणचा परिसर प्रशासनाने निर्जंतुकीकरण केला नाही.याबाबत प्रशासनाविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
- अभिषेक कांबळे,
संचालक, महात्मा फुले सहकारी सुतगिरणी वाघोली