वैद्यकीय सेवा करीत असताना झाले होते बाधित : स्वतःहून करून घेतली तपासणी आणि घेतले उपचार
सांगोला : ईगल आय मीडिया
महुद ( ता. सांगोला ) येथील एक डॉक्टर वैद्यकीय सेवा करीत असतानाच महुद येथे कोरोना बाधित झालो होते. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी स्वतःहून मिरज येथे स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मिरजेला खाजगी रुग्णालयात दाखल झाले. परंतु उपचार सुरू असताना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तेथील डॉक्टरांच्या शिफारशीनुसार हे डॉक्टर होम क्वारंटाईन झाले होते, त्यासंदर्भात ग्राम समितीला कल्पनाही दिली होती, अशी माहिती मंगळवारी समोर आली आहे.
यासंदर्भात मंगळवारी विविध वर्तमानपत्र, online माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर संबंधित डॉक्टरांबाबत समाजात विनाकारण गैरसमज निर्माण होऊ लागला होता.
याविषयी अधिक माहिती घेतली असता समजले की, ‘त्या ‘ डॉक्टरांंना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांनी स्वतःवर आवश्यक ते औषधोपचार सुरू केले होते. तसेच स्वतःहून मिरज येथे खाजगी रुग्णालयात 21 जुलै उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
उपचार सुरू असताना डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती म्हणून शासकीय नियमानुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मिरज येथील डॉक्टरांनी, महुदच्या ‘ त्या ‘ डॉक्टरांना होम क्वारंटाईनची लेखी परवानगी देत घरी सोडले होते. त्यानंतर कोरोनासंदर्भात नियमानुसार होम क्वारंटाईन होण्याची परवानगी दिल्याची कल्पना ‘ त्या ‘ डॉक्टरांनी स्थानिक ग्राम समितीला दिली होती. हॉस्पिटलची होम क्वारंटाईन शिफारस असलेली कागदपत्रे ही दाखवली. त्यानंतरच ‘ ते ‘ डॉक्टर गावात आले होते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार घरी आल्यानंतर ‘ ते ‘ डॉक्टर सामाजिक अंतराची मर्यादा पाळून होम क्वारंटाईन झाले होते.
दरम्यानच्या काळात ग्राम समितीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास सांगितले. आणि त्यानुसार ते डॉक्टर संस्थात्मक क्वारंटाईन होण्यासाठी महुद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतःची दुचाकी घेऊन गेले होते. त्याच वेळी त्यांच्या घरी वैद्यकीय पथक आणि एक पोलीस कर्मचारी आले होते. त्यामूळे परत घरी जाऊन ‘ ते ‘ डॉक्टर रुग्णवाहिकेत बसून संस्थात्मक क्वारंटाईन होण्यासाठी गेले असेही स्थानिक नागरिकाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून महुद येथे चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देऊन नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या डॉक्टरांबाबत विनाकारण गैरसमज पसरल्याचे महुद येथील नागरिकांतून बोलले जात आहे.