अकलूज, माळशिरस, नातेपुते शासकीय धान्य गोदामातील कामगारांची आर्थिक दैना
माळशिरस : ईगल आय मीडिया
तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम अकलुज, माळशिरस व नातेपुते येथील कोविड काळात केलेल्या हमाली कामाचा तब्बल 11 महिन्यांचा मोबदला वारंवार मागणी करुन ही दिला नाही. बिले मिळाली नसल्याने शासकीय हमाल व त्यांचे मुकादम यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. थकीत बिले न मिळाल्याने कामगारांनी 17 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. जोवर पगार होणार नाही तोवर काम करणार नाही असा ईशारा हमाल माथाडी कामगार संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात माळशिरस शासकीय धान्य गोदामातील मुकादम व हमाल कामगार ज्ञानदेव किसन पिसे, नितीन पोपट पिसे, विकिराज शिवाजी पिसे, सौरभ संतोष पिसे, संदीप ज्ञानदेव पिसे, किसन श्रीमंत पिसे आदी कामगारांनी मिळून उपजिल्हाधिकारी पुरवठा विभाग सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
जोपर्यंत कामगारांचे पगार होत नाही,तो पर्यंत काम बंद राहणार.अकलूज ,नातेपुते ,माळशिरस येथील गोदाम चे काम बंद राहील. जोपर्यंत शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार होणार नाहीत तोपर्यंत कुठलेही काम करणार नाही आणि करू ही देणार नाही, असा इशारा हमाल माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिला आहे.
उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलुज माळशिरस व नातेपुते गोदामाचे मुकादम तसेच हमाल यांचा पगार हा २०२० मध्ये कोविड १९ ची मोफत धान्याची हमाली एप्रिल २०२० ते माहे नोव्हेंबर २०२० या कालावधीत केलेली आहे. तसेच फेब्रुवारी- मार्च एप्रिल व मे महिन्यातील हमाली 260 दिवसांची आहे. नियमित केलेल्या हमाली कामाची बिले आजतागायत मिळालेली नाहीत .यामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली असताना आपले कार्यालयाकडून आमचे कामाचे बिले मिळणे बाबत कोणतीही कार्यवाही अजुन झालेली नाही. आपण यामध्ये लक्ष घालुन आमची बिले मिळणेची हमी घ्यावी व आमची बिले १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत मिळणेची तजबिज करावी.
या पूर्वी वरिष्ठांकडे बिलाची वारंवार मागणी केली होती, परंतु संबंधितांनी त्याकडे कानाडोळा केला असल्यामुळे आज कामगारांवर पोटासाठी कष्ट करून सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. पगार बिले वेळेत न मिळालेस आमचेवर आत्महत्या करणेची वेळ येईल, अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी सोलापूर ,प्रांत अधिकारी अकलूज, सोलापूर, तहसीलदार माळशिरस यांना निवेदने देण्यात आली आहेत.