जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्येत 3 ऱ्या स्थानी : दररोज सरासरी 100 रुग्ण वाढ
माळशिरस : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर व बार्शीनंतर आता माळशिरस तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. पंढरपूर आणि बार्शी पाठोपाठ आता माळशिरस तालुका हॉटस्पॉट होत असून रुग्ण संख्येत जिल्ह्यात 3 ऱ्या स्थानी झेपावला आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ दिवसांत तालुक्यात नवीन २ हजार ४०० रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४ मृतांची भर पडली आहे. दरम्यान, करोनामुक्त होण्याचे प्रमाणही ५३ टक्कय़ांवरुन ६५ टक्कय़ांपर्यंत वाढले आहे.
शुक्रवारच्य्या अहवालात माळशिरसमध्ये सर्वाधिक १०२ नवीन रुग्ण सापडले. पंढरपूर येथे ७८ तर बार्शीत ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. माढा येथे ७१ रुग्ण आढळून आले. याशिवाय सांगोला—३६, मंगळवेढा—२७, दक्षिण सोलापूर—१३ याप्रमाणे नव्या रुग्णांची भर पडली. यात माळशिरसमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत आहे.
३१ ऑगस्टपर्यंत माळशिरसमध्ये १३४६ रुग्णसंख्या होती. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता २४०२ रुग्णांची नव्याने भर पडून रुग्णसंख्या ३७४८ तर मृतांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. दरम्यान, माळशिरसमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत १४४६ पैकी ७२१ रुग्ण (५३.५६ टक्के) करोनामुक्त झाले होते. आता करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १२७८ (६४ टक्के) एवढी झाली आहे. यामुळे एकूणच माळशिरस तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात शुुुकरवारी नवे ५०२ रुग्ण सापडले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३१ हजार २८९ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १०९९ झाला आहे. यात जिल्हा ग्रामीणमधील रुग्णसंख्या २३ हजार १०४ आणि मृतांची संख्या ६३३ इतकी झाली आहे. शहर व जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५१ हजार ५७८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत आढळून आलेल्या रुग्णांचे प्रमाण १२.४३ टक्के आहे. यात जिल्हा ग्रामीणमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.३० टक्के आहे.