भगीरथ भालके यांनाच उमेदवारी

सहकार मंत्र्यांची मंगळवेढ्यात ग्वाही : जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

मंगळवेढा : जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित समुदाय

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मतदार संघातील लोकांचे भारत नानांवर असणारे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे, भगीरथ भालके यांना मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत पक्षीय स्तरावर शिफारस करेन, जिल्हाध्यक्षांनी ठरवलेच आहे तर त्यात बदल होणार नाही, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. मंगळवेढा येथील स्व. आ. भारत भालके यांच्या 61 जयंतीनिमित्त मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. शनिवारी सायंकाळी येथील आठवडा बाजार मैदानात  जनसंवाद यात्रेचा शुभारंभ सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, आ प्रणिती शिंदे, आ संजय मामा शिंदे , माजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के,आरपीआय कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, राहुल शहा, पी.बी. पाटील, लतिफ तांबोळी, ऍड. नंदकुमार पवार, भारत बेदरे, मुजम्मिल काझी, नगराध्यक्षा अरुणा माळी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, संगीता कट्टे, विजय खवतोडे, रामचंद्र वाकडे, मारुती वाकडे, अजित जगताप, चंद्रकांत घुले,दिलीप जाधव सह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, भारत भालके यांना मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. साखर कारखान्याचा किंवा 35 गावांच्य पाण्याचा प्रश्न असो कोरोनाच्या अत्यंत खडतर काळात त्यांनी मंत्रालयात येऊन सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या प्रकृतीची त्यांनी अजिबात काळजी केली नाही. जनतेप्रती एवढा संवेदनशील नेता फार क्वचित पाहायला मिळतो. अधिवेशनाच्या काळात लहान – लहान प्रश्नांवर देखील भालके यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी  पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन पाटील यांनी, भारत भालके हे अतिशय संघर्ष करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या संघर्षाचा वारसा भगीरथ भालके निश्‍चितपणे पुढे घेऊन जातील. मतदार संघातील जनतेने त्यांच्या पाठीशी ठाम राहून मतदार संघातील विकास कामे पूर्ण करून घ्यावीत. त्यांच्या आमदार झाल्या नंतरच्या सत्कार समारंभाला मला नक्की बोलवा, असे यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी, पंढरपूर व मंगळवेढ्याचे जनतेच्या मनातील उमेदवार आम्हाला समजला असून या जनसंवाद यात्रेला आलेला जनसमुदाय पाहता भगीरथ भालके यांचे शिवाय इतर आला उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही भगीरथ  यांच्या नावाची मागणी करणार असून इतर उमेदवार याठिकाणी दिला जाणार नाही असे सांगितले.

सोलापूर मध्य मतदार संघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भारत भालके यांचे अधिवेशनातील कार्यकाळाची आठवणींना उजाळा देत, मतदारसंघातील प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडुन पहाडी आवाजामध्ये अधिवेशनातील सभागृहातील सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घेत. एक बहीण म्हणून भगिरथ दादा यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी असून मतदार संघातील जनतेला भालके नानांवर जसे प्रेम केले, तसेच प्रेम भगीरथ दादांवर करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी, मतदारसंघातील लोकांची कामे करण्याची तळमळ मी अत्यंत जवळून पाहिली असून काँग्रेसमध्ये असताना भारत भालके यांनी अनेक विकास कामे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देत असताना भगीरथ भालके यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी द्यावी, अन्यथा इतरांना उमेदवारी दिल्यास त्या उमेदवाराचा पराभव निश्चित होणार आहे हे लक्षात घ्यावे, असा इशारा दिला.

भगीरथ भालके यांनी यावेळी बोलताना , मंगळवेढा भागातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासंबंधी भारत भालके यांनी गेल्या दहा वर्षात सातत्याने प्रयत्न केले. त्यातून 40 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना सात कोटी रुपये लोकवर्गणीची अट रद्द करून निर्माण केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपसा सिंचन योजना मूळ स्वरूपामध्ये मंजूर करून घेतली त्याच्या कामाला सुरुवात येणाऱ्या काही दिवसात होणार असून यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. संत बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहण्यासाठी, तसेच संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा यांचे चरित्र देशभरामध्ये पोहोचण्यासाठी मंगळवेढा तीर्थक्षेत्र पर्यटन विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे . मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी सह. साखर कारखान्याच्या 19 हजारापेक्षा अधिक सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचं कारस्थान विद्यामन संचालक मंडळाने रचले असून याबाबत सहकार मंत्री यांनी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यासंबंधी कार्यवाही करावी, अशी विनंती यावेळी भगीरथ भालके यांनी केली

यावेळी उमेश पाटील, उत्तमराव जानकर, दत्ता म्हस्के,नारायण घुले, शिवानंद पाटील, यशवंत खताळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले. उपस्थितांचे आभार माजी सभापती संभाजी गावकरे यांनी मानले, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!