मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन झाले निष्प्रभ

वरिष्ठ अधिकाऱ्याची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह


मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन निष्क्रिय आणि निष्प्रभ ठरलेले असताना नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांस कोरोना पॉझिटिव्ह झाला असल्याचा रॅपिड टेस्ट चा अहवाल आला आहे. त्यामुळे मंगळवेढा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा तालुका एक आठवड्यापूर्वी कोरोना मुक्त होता मात्र एक आठवड्यात तालुका आणि शहर मिळून 7 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 2 रुग्ण बाहेरून आलेले आहेत तर 5 रुग्ण स्थानिक आहेत. कोरोनाने तालुक्यात शिरकाव केल्यानंतर नागरिक सतर्क झालेले आहेत. लोकांनी स्वतःहून घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. एरवी गजबजणारे शहर गेल्या आठवड्यात सुनसान दिसू लागले आहे. मात्र एवढे होऊनही कोरोनाचा प्रसार थांबताना दिसत नाही. तालुक्यातील संशयित रुग्णांच्या कोरोना तपासणी खूप कमी प्रमाणात झालेल्या आहेत. त्यामुळे जरी शहर व तालुक्यात कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण कमी असले तरी तपासणी वाढवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना संदर्भता फारशी सक्रिय असल्याचे दिसत नाही. शहरात असलेल्या आईसोलेशन, कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना योग्य त्या पद्धतीची आरोग्य सेवा मिळत नाही. नागरिक सतर्क झालेले असताना आरोग्य सेवा मात्र काहीशी निष्काळजीपणे चालू असल्याचे दिसून येत आहे.
याच निष्काळजी पणाचा फटका थेट आरोग्य विभागास बसल्याचे दिसून येते. तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आला असून यामुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता कन्फर्म करण्यासाठी swab घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी बदली वर, पोलीस निरीक्षक रजेवर
कोरोनाची परिस्थिती गंभीर वळणावर येऊन ठेपलेली असताना मंगळवेढा येथील महत्वाची पदे रिक्त आहेत. नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली झाली आहे तर तालुका पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे रजेवर गेले आहेत. त्यामुळे पंढरपूर येथील अधिकाऱ्यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रांताधिकारी यांचा प्रशासनावर प्रभाव दिसून येत नाही. तर राजकीय नेते आपल्याच घरी सुरक्षित रहा या प्रचाराचे तंतोतंत पालन करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी शहर व ग्रामीण च्या नागरिकांनी तूच आहे तुझ्या आरोग्याचा रक्षक ही भूमिका घेऊन सतर्कतेला प्राधान्य दिले आहे. प्रशासन मात्र निष्प्रभ आणि निष्क्रिय दिसत आहे. प्रातांधिकारी यांनी आपला प्रभाव वाढवणे आणि आरोग्य यंत्रणा जबाबदारीने आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!