रतनचंद शहा सहकारी बँकेच्या माजी सरव्यवस्थापकासह वसुली अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
कर्जदारांने कर्जाचे भरलेले हप्ते त्याच्या कर्ज खात्यावर न भरता स्वत:कडे ठेवून कर्जदारास त्रास दिला आणि त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बॅकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर व वसुली अधिकारी बसवेश्वर सलगरकर (माळी) यांच्या विरोधात मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचा भाऊ गंगासागर पाटील ( रा.भाळवणी, ता.मंगळवेढा ) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश बसवेश्वर पाटील ( रा.भाळवणी ) यांनी रतनचंद शहा सहकारी बॅकेकडून 2014 साली 6 लाख रू कर्ज घेतले होते. या कर्जाच्या हप्त्यापोटी 2 लाख व 1 लाख रू. सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांना दिले होतेे. मात्र त्यानी त्या रकमेची पावती दिली नाही. वारंवार मागणी करून ही त्यानी टाळाटाळ केली. दरम्यान, पाटील यानी हा प्रकार बॅकेच्या अध्यक्षास सांगितल्या नंंतर त्यांनीही तुमचा व्यवहार आहे, तुम्ही बघून घ्या, असे सांगितले.
दिलेली कर्ज खात्याला न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली. आणि वसुलीसाठी बसवेश्वर सलगरकर (माळी) यांनी त्रास देत तगादा लावला. या त्रासाला कंटाळून शैलेश पाटील यांनी 15 मार्च रोजी रात्री 12 नंतर राहत्या घरी विषारी औषध घेतले. पहाटेच्या दरम्यान त्याना त्रास होवू लागल्यामुळे उपचारासाठी पंढरपूरात दाखल केले उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी शैलेश पाटील यांनी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकार्ड करून, त्यात सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर व वसुली अधिकारी बसवेश्वर सलगरकर, यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
सध्या मार्च अखेर असल्याने सर्वत्र बँकांची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रतनचंद शहा बॅकेच्या सरव्यवस्थापक व वसुली अधिकाऱ्या विरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरवून गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करत आहेत.