मंगळवेढा : ईगल आय मिडीया
मंगळवेढा येथील सबजेलमध्ये असलेल्या चाळीसपैकी 28 कैद्यासह एक पोलीस अधिकारी, दोन सुरक्षा कर्मचारी आणि एक आहार पुरवठादार अशा 32 जणांचे रॅपिड एंटीजन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील सबजेलमध्ये एकूण 40 कैदी आहेत. त्यापैकी 33 पुरुष, दोन महिला आणि न्यायालयीन कोठडी मधील पाच पुरुष या लोकांचा समावेश आहे. या चाळीस कैद्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट 17 जुलै रोजी घेण्यात आली. त्यातील 12 कैदी निगेटिव्ह आढळले तर तब्बल 28 कैद्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर सबजेलचे 1 पोलीस अधिकारी, दोन सुरक्षा कर्मचारी आणि सबजेलचा एक आहार पुरवठादार यांचे ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पोलीस अधिकारी, कैदी, सुरक्षा कर्मचारी यांचे एकूण 32 लोक पॉझिटिव असल्याचे रॅपिड एंटीजन टेस्ट द्वारे समजले आहे.या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सलगर बु प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आले आहेत,त्यांच्या संपर्कातील 41 लोकांचे टेस्ट घेण्यात आले. त्यापैकी 30 निगेटिव्ह तर 2 जण पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्हीही प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी आहेत. मंगळवेढा तालुक्यात यापूर्वीच 12 लोकांचे अहवाल पॉझिटिव आलेले आहेत, त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी सोडलेला आहे, तर शुक्रवारी सापडलेल्या 34 पॉझिटिव्ह रुग्णांसह तालुक्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 48 वर पोचली आहे.
मागील आठवड्यापर्यंत मंगळवेढा तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता, परंतु सहा दिवसातच तालुक्यातील रुग्णांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत असल्यामुळे नागरिकातून याविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रशासन योग्य ती व सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले आहे.