वाढत्या अवैध धंदयाविराेधात सर्व राजकिय पक्ष एकवटले
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवैध धंदयासह चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. सर्व अवैध धंदयावर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम वरीष्ठ पोलिस अधिकार्याची मंगळवेढयाला गरज असल्याने भा.ज.पा. शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी या सर्व पक्षाचे कार्यकर्ते अवैध धंदयाच्या विरोधात एकटवले आहेत. सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन पोलिस प्रशासनास देवून सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात अवैध्य मटका, दारू, जुगार, बेकायदा वाळू उपसा आदी व्यवसायाने मोठया प्रमाणात वाढल्याने गोरगरीबांचे संसार रस्त्यावर येत आहेत.
यामध्ये तरूण मुले अडकल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या चोर्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असून चोरटयांना पकडण्यास पोलिस प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरत आहे.
या वाढत्या अवैध व्यवसायाला पोलिस प्रशासनच जबाबदार असून कारवाई करण्यात ते कुचकामी ठरत असल्याने मंगळवेढयाला सध्या कार्यक्षम वरीष्ठ पोलिस अधिकार्याची गरज आहे. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंदयाबाबत संबंधित पोलिस अधिकार्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा दिला असतानाही त्याकडे वरीष्ठ पोलिस अधिकार्यांनी साफ दुर्लक्ष केल्यानेच अवैध धंदयात वाढ होत असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे.
या अवैध धंदयाबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना या निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या असून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष औदुंंबर वाडदेकर,भा.ज.पा.चे सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भारत बेदरे, भा.ज.पा शहराध्यक्ष गोपाळ भगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड.राहुल घुले, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, शिवसेना तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार संघाध्यक्ष मारुती वाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुझम्मील काझी, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.