मंगळवेढा तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात 6 जण जखमी

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

बावची (ता.मंगळवेढा) येथे लांडग्याच्या हल्ल्यात सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या परिसरात वन्य प्राणी आढळून येत असूनही वनविभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांची मागणी होत आहे .


शनिवार (दि. १२ जून ) रोजी बावची येथे पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांवर हल्ला करून त्यांना चावा घेवून गंभीर जखमी केलेले आहे. यामध्ये यशराज राजू फोंडे (वय १५ वर्षे ) सुकदेव सिदू जाधव (वय ६० वर्षे ) तानाजी श्रीरंग चव्हाण (वय ३२ वर्षे ) या तिघाना तातडीने सोलापूर येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी गावातील महेश खांडेकर यांनी स्वतःच्या गाडीतून दाखल केले आहे.

याशिवाय अनुसया बसवराज माळी ( वय ३५ वर्षे ) पार्वती इराप्पा माळी ( वय ३२वर्षे ) आणि भारत विठोबा म्हमाणे (रा. पौट, ता.मंगळवेढा ) या तिघानाही लांडग्याने जखमी केलेले आहे. तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे , एक गाय व म्हैस यांनाही लांडग्याने चावा घेतलाआहे. सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांतून बोलले जात असून सायं ४ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत लांडगा आणि भयभीत नागरिक यांच्यातील हा थरार चालू होता. त्यामुळे बावची परिसरातील सर्व नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.


बावची गावचे पोलीस पाटील श्री . महावीर भोसले यांनी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना घेवून रात्री पोलीसांशी संपर्क साधून ही बाबमी कळविली व घटनास्थळी भेट दिली.


सरपंच मिननाथ चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव येडवे यांनी रात्री सर्वांशी फोनवरून संपर्क करून सावध राहण्याचे आवाहन केले. बावची येथील वनक्षेत्रात अनेक वन्यजीव आढळून येतात, परंतु कोणतेही कुंपण नसल्याने त्यांच्या वावरास प्रतिबंध करता येत नाही. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क होवू शकला नाही याबाबत सर्व नागरिकांतुन नाराजी व्यक्त होत आहे . हुलजंती बीटचे हवालदार सलगर यांनी बावची येथे घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!