मंगळवेढा उपसासिंचन योजना : 2 TMC पाण्यास शासन मंजुरी

बुधवारी शासन निर्णय झाला : म आ वि सरकारने शब्द पाळला

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांसाठी मंजूर उपसा सिंचन योजनेतील फडणवीस सरकारने कमी केलेले 1 टीएमसी पाणी पुन्हा वाढवून देत महाविकास आघाडी सरकारने दिवंगत आ.भारत भालके यांच्या स्वप्नपूर्ती च्या दिशेने एक।पाऊल टाकले आहे. उजनी प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेर नियोजन बैठकीत बुधवारी शासनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी एकूण 2 टीएमसी पाणी तरतूद केल्याचा आदेश काढला आहे. शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे.


जलसंपदा विभागाच्या वतीने उजनी धरणातील पाणी वापराच्या फेर नियोजनाबद्दल आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सन 2021च्या सुधारित ताळेबंदासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अहवालानुसार 2388.09 दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे.

2014 साली स्व.आ.भारत भालके यांच्या प्रयत्नातून जवळपास 560 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे फडणवीस सरकारने ही योजना गुंडाळून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्व आ. भालके यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत या योजनेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि न्यायालयात जाऊन योजनेच अस्तित्व कायम ठेवले. दरम्यान, फडणवीस सरकारने योजनेतील 11 गावे वगळून 1 टीएमसी पाणी कमी केले होते. त्यामुळे आ.भालके यांना संघर्ष करावा लागला होता.

2019 च्या तृतीय सुप्रमा अहवालानुसार मंगळवेढ्याच्या उपसा सिंचन योजनेसाठी 28.598 दलघमी इतके पाणी मंजूर होते. तालुक्यावर होणारा अन्याय स्व आ भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत जलसंपदा मंत्र्याच्या दालनात या योजनेतील 11 गावे व 2 टी.एम.सी.पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीस मान्यता दिली. यावर बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्‍टरचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा कृष्ण खोरे महामंडळाने उघडली व सर्वेक्षण सुरू झाले. पाणी वाटपाबाबत झालेल्या बैठकीत आता मंगळवेढ्याच्या योजनेसाठी 57.763 दलघमी पाणी मंजुर झाले.

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकऱ्याच्या आशा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्या असून येत्या काही दिवसात या योजनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर ही राजकीय सुड न काढता गेल्या तेरा वर्षापासून स्व आ भारत भालके यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष सार्थकी लागला आहे अशी। भावना व्यक्त होत आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून वंचित गावांना पाणी देण्याबाबतचा शब्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगर बुद्रुक येथील पोटनिवडणुकीत प्रचार सभेत दिला. त्यांच्या शब्दाप्रमाणे 35 गावातील नागरिक राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिले.
पांडूरंग चौगुले,35 गाव पाणी संघर्ष समिती

Leave a Reply

error: Content is protected !!