मराठा आक्रोश मोर्चाची जागोजागी अडवणूक

अनेक ठिकाणी पोलीस – मोर्चेकऱ्यांत संघर्ष

बाळे येथे पोलिसांनी रोखल्यानंतर आ मोहिते पाटील, आ परिचारक यांनी रस्त्यावर ठिय्या दिला

सोलापूर : ईगल आय मीडिया

सध्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी सोलापूरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची परवानगी नसतानाही मराठा आंदोलकांनी मोर्चा काढल्याने पोलिसांकडून मोर्चा थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पोलीस यंत्रणेकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह येणाऱ्या मार्गावर जागोजागी पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणाव, वादावादी, ठिय्या आंदोलने सुरू असल्याचे दिसते.

दरम्यान, या मोर्चाला येणाऱ्या मराठा नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत टेंभुर्णी येथे रोखल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. आम रणजित सिंह मोहिते पाटील यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळं पुणे-सोलापूर -हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निघालेला हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याच्या चर्चेने मराठा समाजाने या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं आंदोलनस्थळी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सोलापूर शहरातील मोर्चा च्या नियोजित मार्गावरील सर्व रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात वादावादी ,घोषणाबाजी होत आहे. आम.विजयकुमार देशमुख, महापौर कांचन यंनाम यांची ही अडवणूक केली आहे.

या मोर्चाचे संयोजक आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा हा सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. या सर्व परिस्थितीच्या आढावा घेत सरकारने मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!