मराठा आक्रोश मोर्चा प्रतिकात्मक होणार ?
सोलापूर : ईगल आय मीडिया
उद्या ( 4 जुलै ) रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. मोर्चाचे संयोजक भाजप नेते नरेंद्र पाटील,भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जरी मोर्चा होणार असल्याचे सांगत असले तरी सोलापूर मध्ये रविवारी दिवसभर संचार बंदी लागू केलेली आहे.तसेच सोलापूरकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी केल्यामुळे सोलापूर शहरात मोर्चेकरी येऊ शकतील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूणच कोरोनाची दुसरी लाट कायम असताना ही उद्या होणारा मराठा आक्रोश मोर्चा होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने हाय कोर्टाच्या निर्देशांवये तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोकांची गर्दी होऊ नये त्यासाठी दिलेल्या आदेशान्वये कोणत्याही प्रकारच्या मोर्चा, आंदोलनास परवानगी दिली जात नाही. त्याच अनुषंगाने 04/07/2021 रोजी सोलापूर येथे आयोजित मराठा आक्रोश मोर्चास परवानगी दिल्याबाबत खोटा संदेश समाज माध्यंमामध्ये फिरत आहे. सदर चा मेसेज खोटा व चुकीचा असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून अशा प्रकारची कोणतीही परवानगी मराठा आंदोलनास दिलेली नसून सोलापूर शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली असून सोलापूर जिल्ह्यात कलम 144 लागू असून जमावबंदी लागू आहे. कृपया लोकांनी भूलथापांना बळी न पडता घरात राहुन कोरोना च प्रसार होऊ नये प्रशासनास सहकार्य करावे.
अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण साठी 4 जुलै रोजी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला सर्व पक्षीय पाठिंबा मिळावा म्हणून नरेंद्र पाटील यांनी प्रयत्न केले असले तरीही बहुतांश मराठा समाज संघटना मोर्चापासून बाजूला राहिल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सह इतर पक्षांचे पदाधिकारी सुद्धा या मोर्चापासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे जरी मोर्चाचे आयोजक आक्रोश मोर्चा सर्व पक्षीय असल्याचा दावा करीत असले तरीही हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात उद्या रविवारी दिवसभर कलम 144 लागू केले असून शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी लागू केलेली आहे. हजारो पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, होमगार्ड रस्त्यावर जागोजागी अडवून ठेवणार आहेत. त्यासाठी लोखंडी आणि लाकडी अडथळे उभा केले आहेत.
खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह अनेक भाजप नेते सोलापुरात मोर्चासाठी दाखल झाले आहेत. मात्र शहरातील संचारबंदी आणि येणाऱ्या मार्गावरील नाके बंदी लक्षात घेता मोर्चा प्रतिकात्मक होण्याची शक्यता आहे.