राज्य आणि केंद्र सरकारचा केला निषेध
मोहोळ : ईगल आय मीडिया
केंद्र आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षण मागणी याचिकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी मोहोळ तालुक्यातील मराठा बांधवांनी तिरडी आंदोलन करीत राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला.
मोहोळ येथील मराठा बांधव आणि मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तिरडी बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मोहोळ तहसील कार्यालय गाठले. या वेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, राज्य आणि केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी मोहोळ तहसील प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. या तिरडी आंदोलनात मोहोळ शहर व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.