उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
टीम : ईगल आय मीडिया
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असता, या बाबत मी योग्य तो निर्णय घेईन असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यासंदर्भात भेटीनंतर पत्रकारांशी अजित पवार बोलले.
अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले की, “मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.
ज्या 12 जणांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवली आहे, त्यावर राज्यपालांचा काही आक्षेप आहे का? अशी विचारणा केली असता, यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला तर बरं होईल. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळं ऐकून घेतलं आहे, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईन.
खालील 12 नावांची शिफारस राज्य सरकारने विधानपरिषद सदस्य नियुक्ती साठी केली आहे.
काँग्रेस :- १) सचिन सावंत, २) रजनी पाटील, ३) मुजफ्फर हुसैन, ४) अनिरुद्ध वणगे
राष्ट्रवादी काँग्रेस :- १) एकनाथ खडसे, २) राजू शेट्टी, ३) यशपाल भिंगे, ४) आनंद शिंदे
शिवसेना उमेदवार :- १)उर्मिला मातोंडकर, २) नितीन बानगुडे – पाटील, ३) विजय करंजकर, ४) चंद्रकांत रघुवंशी