गाळप हंगाम सुरू होण्याच्या अपेक्षा उंचावल्या
पंढरपूर : ईगल आय मिडीया
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ६० कोटीच्या कर्जाला राज्य शासनाकडून थकहमी मिळालेली आहे. यासाठी चेअरमन आ. भारत भालके यांच्याकडून प्रयत्न सुरू होते, त्याला यश मिळाले आहे. आता नव्याने कर्ज मंजुरी मिळून हंगाम सुरळीत सुरु होईल असे चित्र आहे. कारखाना प्रशासनाकडून यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये शासनाची सहकारी साखर कारखान्यां विषयीचे धोरणे, उसाची कमतरता यासह इतर कारणांमुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना गतवर्षी बंद राहिला. यंदा मात्र उसाची उपलब्धता चांगली आहे, कारखान्याच्या कर्जाला हमी हमी मिळावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला संचालक मंडळाची मालमत्ता तारण द्यावी अशा प्रकारची अट घालण्यात आली होती. यामुळे थकहमी मिळण्यास विलंब झाल्याचे समोर येत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन दिवसापूर्वी सदरची थकहमी मंजूर करण्यात आली.
कोरोनाच्या काळातही आम भालके मुंबईत
राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे, त्यातच मुंबई तर देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले हॉटस्पॉट शहर आहे. असे असतानाही आम भालके गेल्या काही दिवसांपासून मुबंई त तळ ठोकून आहेत. कोरोनाच्या संकटाला सामोरे जात यंदा कारखाना सुरूच करायचा या निर्धाराने आम भालके यांचे प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी चेअरमन आमदार भारत भालके यांच्याकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. आता नव्याने कर्ज घेता येणार असल्याने ऊस उत्पादक सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा ही सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा असून यामध्ये राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे हित पहावे, विद्यमान पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी कारखान्याचे गतवैभव प्राप्त करून द्यावे अशा अपेक्षा सामान्य शेतकऱ्यांची आहे.