मायक्रो फायनान्स कंपन्याविरोधात राज ठाकरे आक्रमक

अन्यथा मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करतील : दिला इशारा

टीम : ईगल आय मीडिया

कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्यांचा चारचौघात अपमान करणं असे प्रकार सर्रास सुरु आहेत. या विषयांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, हे जर असंच सुरु राहिलं तर लक्षात ठेवा याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील. सरकार म्हणून आता तरी जागे व्हा आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा, हे सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा ईशारा देणारं पत्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी हा महत्वाचा विषय उचलून धरला असून त्यांच्याच नेतृत्वाखाली लॉक डाऊन काळातील महिला बचत गटासह छोट्या व्यापाऱ्यांचाही सर्वात मोठा मोर्चा पंढरीत निघाला होता. बुधवारी यासंदर्भात धोत्रे यांनी मुंबईत जाऊन सविस्तर माहिती राज ठाकरे यांच्याकडे दिली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर ठाकरे यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं असून आता मायक्रो फायनान्स ची वसुली आणि महिला बचत गटाचा विषय राज्यस्तरीय झाला आहे. याचे श्रेय मनसेच्या पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि दिलीप धोत्रे यांना असल्याचे मानले जाते.

संपूर्ण अर्थव्यवस्थाच मागील सहा महिने ठप्प आहे. त्यामुळे माता-भगिनी कर्जाचे हप्ते भरु शकतील याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे महिलांचं कर्ज माफ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पावलं उचलायला हवीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांकडून विमा उतरवतो म्हणून विम्याचा हप्ता घेतला आहे. मात्र व्यवसाय ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते देणं जेव्हा या महिलांना शक्य नाही आणि या महिला विम्याच्या पॉलिसीची मागणी करत आहेत ते देण्यास या कंपन्या टाळाटाळ करत आहेत.

यामध्ये या माता-भगिनींनी विम्याची रक्कम दिली असली तरीही त्यांचा विमा उतरवण्यातच आलेला नाही अशी शंका येते आहे. त्यामुळे या महिलांना विम्याची कागदपत्रं तर मिळायलाच हवीत शिवाय विमा कवचाचा लाभही मिळाला पाहिजे असंही राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!