दरवाढीच्या प्रश्नांवर स्वाभिमानीचा एल्गार
सोलापूर : ईगल आय मीडिया
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच रस्त्यावर उतरत आलेली आहे. माझ्यासाठी सध्या दूध दरवाढ हाच मुख्य मुद्दा असून आमदारकी वगैरे नंतर पाहू , असे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकार विरोधात सोलापुरातून एल्गार पुकारला.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेट्टी यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते यासह शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आम्ही कुणाच्याही दारात जाणार नाही. आम्हाला दुधाला दर हवा आहे. यापुढे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असेही शेट्टी म्हणाले. शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, दुग्धजन्य पदार्थांना वरील जीएसटी केंद्र शासनाने रद्द करावी, दुग्धजन्य पदार्थ निर्यातीसाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, प. महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष राहुल घुले, सांगली जिल्हाध्यक्ष संदिप राजोबा, सोलापूर जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, तानाजी बागल, शिवाजी पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, माळशिरसचे अजित बोरकर, मंगळवेढ्याचे श्रीमंत केदार, अक्कलकोटचे नरेंद्र पाटील, माढ्याचे सत्यवान गायकवाड, मोहोळचे पप्पू पाटील, रविंद्र गोडसे, उमाशंकर बिराजदार, बिळ्यांनी सुंटे आदीसह जिल्ह्याभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.