मुंबईला जाताना कारला वाशी टोलनाक्याजवळ झाला अपघात
टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी रात्री मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात झाला. अपघातात शिंदे यांच्या हाताला मार लागला व अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कऱ्हे तलावली गावात घडला होता. या घटनेनंतर शिंदे यांच्या समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या कारला अपघात झाल्याने त्यांचे कार्यकर्ते चिंता व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने गुरुवारी मुंबईला चालले होते. वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर शिंदे यांच्या कारला अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.
शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता उत्तम आहे व काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.