आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना बाधित

टीम ईगल आय मीडिया

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली तर रात्री उशिरा राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.


“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असं राजेश टोपे ट्विटरवर म्हणाले आहेत


महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राजेश टोपे सक्षमपणे आरोग्य विभागाचं नेतृत्व करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक आव्हानं होती. या सर्व आव्हानांना तोंड देत राजेश टोपे लढत राहीले. या काळात त्यांनी उभारलेली यंत्रणा कौतुकास्पद होती. त्यांच्या कार्यामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. ते अद्यापही राज्यातील विविध भागांमध्ये स्वत: जावून आढावा घेत होते. कोरोना संकट काळात त्यांच्या आईचंदेखील निधन झालं. मात्र, एवढं मोठं दु:ख सोसत ते राज्यात उपाययोजना करत होते. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्यांना लढवय्या आरोग्यमंत्री देखील म्हटलं जातं.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी या महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!