शहरातील खड्डयांबाबत आमदारांचे आंदोलन कधी ?

पंढरपूर शहरातील नागरिकांचे लागले लक्ष !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कधी पंढरपूर – कुरुल तर कधी पंढरपूर – सांगोला रस्त्याच्या प्रश्नांवर आंदोलन करणारे भाजपचे दोन्ही स्थानिक आमदार पंढरपूर शहरातील खड्डयांबाबत कधी आंदोलन करणार आहेत ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर तरी दोन्ही आमदारांनी पंढरपूरकरांचे कंबरडे मोडणाऱ्या खड्डयांबाबत आंदोलन करून आवाज उठवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंढरपूर ते सांगोला या मार्गावरील चौथा मैल येथे वनविभागाच्या परवानगी अभावी सुमारे 300 मीटर्सचे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या दरम्यान रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत आणि वाहनधारकांना कसरत करीत जावे लागते. या ठिकाणची जमीन वनविभागाची असून त्यांच्या परवानगी शिवाय वन विभागाच्या हद्दीत काम करता येत नाही. सुमारे 2 वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. या विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका भाजपच्या वतीने विधानपरिषद सदस्य आम.प्रशांत परिचारक व आ.समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या ( दि. 17 ऑक्टोबर ) रोजी चौथा मैल येथे भव्य रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

आमदार महोदयांनी प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी किती प्रयत्न केले याकडे कानाडोळा करून उद्याच्या आंदोलनात पंढरपूर सांगोला मार्गावरील वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हजारो लोक उद्या रस्त्यावर आंदोलन करून राज्य सरकारच्या या विषयी असलेल्या निष्क्रियतेवर आवाज उठवणार आहेत.

असाच आवाज दोन्ही आमदार महोदयांनी पंढरपूर कुरुल या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत उठवून त्या मार्गावरील वाहनधारकांना दिलासा दिला आहे. लवरकच त्या मार्गावर हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असल्याच्या पोस्ट ही सोशल मीडियावर फिरत आहेत. व्हिजनरी आणि दबंग आमदारांच्या या कामगिरीमुळे पंढरपूर च्या नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

गेल्या 6 महिन्यापासून पंढरपूर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यांमुळे शेकडो नागरिकांच्या कम्बरा मोडल्या आहेत आणि अनेकांचे मणके जायबंदी झाले आहेत. पंढरपुर शहरातील एकही रस्ता एकही फूट धड चालता येईल अशा अवस्थेत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. शिवाय आता मंदिर सुरू झाल्याने शहरात येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी वाढली आहे, प्रदक्षिणा मार्गावरील खड्ड्यांत अनेक वारकरी गडप झाल्याची ही चर्चा शहरात सुरू आहे. एवढे भयानक खड्डे शहरात निर्माण झाले आहेत.

एकवेळ ‘ कोरोना परवडला पण खड्डे नको ‘ अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या या निष्क्रियतेवर आ.परिचारक आणि अवताडे यांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच या विषयी दोन्ही आमदार महोदय कधी आंदोलन छेडतात याकडे पंढरपुरच्या नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!