लोकनेत्यास हजारो लोकांच्या साक्षीने अखेरचा निरोप

हजारो साश्रु नयनांनी दिला लाडक्या नेत्याला निरोप

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भल्या सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा अंग टाकेपर्यंत ज्या नेत्याला लोकांमध्ये राहण्याचं व्यसन होतं, त्याच नेत्याला कोरोनाच्या काळातही हजारो लोकांच्या साक्षीने, डबडबलेल्या, पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. नावातच भारत असल्याचा आणि त्याचा अभिमान असलेल्या नेत्याला राष्ट्रध्वजाचे सन्मानजनक पांघरून, पोलिसांची मानवंदना आणि बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन सन्मानाने निरोप दिला गेला. आयुष्यभर केलेला संघर्ष, केलेल्या कष्टाचे चीज झाले. लोकांचा नेता, लाखो लोकांच्या सद्गदित भावनांची फुले पायतळी घेऊन मोठ्या दिमाखात इहलोकी गेला. लोकनेते भारत नाना भालके यांना हजारो साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. सरकोली येथे त्यांच्या जन्मभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आम. संजय मामा शिंदे, आ.प्रणिती शिंदे, आम.यशवंत माने,आ.प्रशांत परिचारक, माजी खा.धनंजय महाडीक यांच्यासह असंख्य राजकीय पदाधिकारी,नेते, हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते. पुत्र भगीरथ भालके यांनी आपल्या पित्याच्या पार्थिवास अग्नी दिला आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील हा विकासाचा सूर्य ही काळाच्या क्षितिजा आड दडला.

आ.भारत भालके यांचे आज ( दि.28 ) मध्यरात्री पुणे येथे निधन झाले.त्यांच्या निधनाने पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातवर शोककळा पसरली, दोन्ही शहरे आणि तालुक्यातील असंख्य गावे कडकडीत बंद झाली. भालके यांच्या अंत्य यात्रेसाठी, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारो लोकांनी कोरोनाची भीती झुगारून हजेरी लावली. आयुष्यभर लोकांच्यामध्ये रमणारा हा नेता कोरोना काळात गर्दीवर मर्यादा आलेल्या असतानाही हजारो लोकांच्या साक्षीने लोकांच्या समक्ष अंतिम प्रवासाला कायमचा निघून गेला.

तत्पूर्वी पुण्यातून त्यांचे पार्थिव तालुक्यात आले असता जागोजागी त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभा होते. पंढरपूर शहरात हजारो लोकांनी आपल्या नेत्याची मुख्य मार्गावरून काही वेळ सोबत केली, आणि साश्रु नयनांनी त्यांना निरोप दिला. मंगळवेढा शहरातही आपल्या नेत्याला पाहण्यासाठी हजारो लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. कोणत्याही नेत्याच्या नशिबी एवढ्या मोठ्या सन्मानाचा निरोप अलीकडच्या कोरोना काळात मिळाला नाही. मात्र भारत नानांनी केलेल्या कामाचे फळ म्हणावे लागेल की लोकांचा नेता, लोकांच्या साक्षीने, त्यांच्या सोबतीने, अश्रूंच्या चिंब सद्भावना सोबत घेऊन भारत नाना अमर रहे च्या घोषणांची फुले झेलत अनंताच्या प्रवासाला गेला.

Leave a Reply

error: Content is protected !!